वाक्य रूपांतर किंवा वाक्य परिवर्तन
वाक्यांचे रूपांतर करताना वाक्यरचनेत बदल होतो; पण वाक्याचा अर्थ बदलत नाही.
वाक्याचा अर्थ न बदलता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्यरूपांतर.
उदाहरणार्थ,
मुलांनी शिस्त पाळणे खूप आवश्यक आहे. (विधानार्थी वाक्य.)
किती आवश्यक आहे मुलांनी शिस्त पाळणे! (उद्गारार्थी वाक्य.)
मुलांनी शिस्त पाळणे आवश्यक नाही का? (प्रश्नार्थी वाक्य.)
मुलांनो, शिस्त अवश्य पाळा. (आज्ञार्थी वाक्य.)
होकारार्थी वाक्यांचे नकारार्थी रूपांतर
आमच्या शाळेचा संघ विजयी झाला. (होकारार्थी.)
आमच्या शाळेचा संघ पराभूत झाला नाही. (नकारार्थी.)
लोकांचे दारिद्र्य पाहून मला दु:ख होते. (होकारार्थी)
लोकांचे दारिद्र्य पाहून मला आनंद होत नाही. (नकारार्थी)
त्याच्यासाठी हजार रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. (होकारार्थी)
त्याच्यासाठी हजार रुपये ही देखील लहान रक्कम नाही. (नकारार्थी)
ही कल्पना चांगली आहे. (होकारार्थी)
ही कल्पना वाईट नाही. (नकारार्थी)
प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर.
स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का? (प्रश्नार्थी)
स्वयंशिस्त ही खरी शिस्त आहे. (विधानार्थी)
जगात सर्व सुखी असा कोण आहे? (प्रश्नार्थी)
जगात सर्व सुखी असा कोणी नाही. (विधानार्थी)
अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? (प्रश्नार्थी)
अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो. (विधानार्थी)
नकारार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतर
मोबाइलचा अतिवापर योग्य नाही.
मोबाइलचा अतिवापर टाळा.
नकारार्थी वाक्याचे प्रश्नार्थी वाक्यात रूपांतर
खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते.
खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असते का?
उद्गारार्थी वाक्यांचे विधानार्थी वाक्यात रूपांतर.
बापरे! किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले!
तरुण मुले खूप वेगाने वाहने चालवतात.
बापरे! केवढी उंच आहे ही इमारत! (उद्गारार्थी)
ही इमारत खूपच उंच आहे. (विधानार्थी)
किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री! (उद्गारार्थी
काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला. (विधानार्थी)
आज्ञार्थी वाक्यांचे विधानार्थी वाक्यात रूपांतर.
तू नियमित व्यायाम कर. (आज्ञार्थी)
तू नियमित व्यायाम करावास. (विधानार्थी)
ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा. (आज्ञार्थी)
ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे. (विधानार्थी)
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.
(१) व्यायाम आरोग्यास हितकारक आहे. (नकारार्थी करा.)
(२) तुम्ही काम चांगले करा. (विधानार्थी करा.)
(३) किती सुंदर आहे हे फूल! (विधानार्थी करा.)
(४) गुलाब सर्वांना आवडतो. (प्रश्नार्थी करा.)
(५) चैनीच्या वस्तू महाग असतात. (नकारार्थी करा.)
(६) तुझ्या यशाने खूप आनंद झाला. (उद्गारार्थी करा.)
(७) अरेरे! किती घाणेरडे कपडे ! (विधानार्थी करा.)
(८) तुम्ही खोटे बोलू नका. (होकारार्थी करा.)
(९) श्रीमंत व्हावे असे कोणाला वाटत नाही? (विधानार्थी करा.)
(१०) मोठ्या आवाजात गाणी वाजवू नये. (होकारार्थी करा.)
(११) दररोज अभ्यास करावा . (आज्ञार्थी करा)
(१२) मला हे चित्र नापसंत नाही. (होकारार्थी करा)
(१३) तू रोज व्यायाम करतो का? (विधानार्थी करा)
(१४) अरेरे काय झाले. (उदगारार्थी करा)
(१५) मी सहलीला जाईल. (नकारार्थी करा)