This page is incomplete and under construction
वाचताना थांबायचे कुठे आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा वापर होतो.
मराठी ही मोडी लिपीत लिहिली जाई. त्या लिपीत विरामचिन्हे नव्हती, संस्कृतमध्येही 'दंड' सोडल्यास अन्य विरामचिन्हे नव्हती. मराठी-इंग्रजी शब्दकोशकार मेजर थाॅमस कँडी याने मराठी देवनागरीत लिहायला सुरुवात केली आणि विरामचिन्हे पहिल्यांदा वापरली.
अपूर्णविरामासारखा एखाद-दुसरा अपवाद वगळता, विराम चिन्ह हे अक्षराला चिकटून येते; अक्षर आणि विरामचिन्ह यांच्या दरम्यान जागा सोडायला परवानगी नाही. मात्र विरामचिन्हानंतर एक जागा सोडूनच पुढचा शब्द (असल्यास) लिहितात.
आपण जेव्हा बोलतो त्यावेळी आपले बोलणे ऐकणाऱ्याला अचूकपणे कळते. ते लिहिताना मात्र प्रमाणलेखनात असावे. कारण वाचणारा दुनियेच्या कुठल्याशा कोपऱ्यात असतो हे आपल्याला माहीत असतेच असे नाही. शिवाय प्रमाणलेखन भाषेचे/लिपीचे सौंदर्य वाढवत असते. वाचताना थांबायचे कुठे, किती वेळ आणि कोणत्या शब्दावर जोर द्यायचा यासाठी विरामचिन्हांचा उपयोग होतो. वाचणाऱ्याला आपल्या मनातील भावना नेमकेपणाने कळवाव्यात यासाठीही ते आवश्यक वाटते.
भाषाभाषांत थोड्याफार फरकाने नियम सारखेच असतात. संस्कृत भाषा देवनागरी लिपीत लिहिताना केवळ दंड (।) या व्याकरण चिन्हाचा वापर केला जाई. मोडी लिपीत ऱ्हस्व-दीर्घ नसायचे तशी व्याकरण चिन्हेही नसायची.
विरामचिन्हाचे प्रकार-
पूर्णविराम ( . ) (Full Stop)
वाक्याच्या शेवटी वाक्य पूर्ण झाल्याचे दर्शवण्यासाठी वापरतात. उदा० अ) मी मराठी बोलतो. ब) हे चिह्न संक्षिप्त रूपात शेवटीही वापरतात. उदा० वि.स. खांडेकर यात विष्णूऐवजी वि.आणि सखारामऐवजी स. ही संक्षिप्त रूपे वापरून त्यांसमोर पूर्णविरामासारखे चिन्ह काढले आहे.
स्वल्पविराम ( , )
एकाच विभागातील अनेक शब्द वाक्यात सलग आल्यास ते शेवटचे दोन शब्द सोडून पहिले सर्व शब्द दर्शवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. शेवटच्या दोन शब्दांमध्ये व/आणि वापरतात. एखाद्याला हाक मारल्यानंतर नाव किंवा संबोधन यापुढे हे चिन्ह वापरतात. उदा० अ) शीतकपाटात भाजी,गाजरे,पालक,बीट व काकडी आहे. ब) श्रोतेहो, आज आपण या विषयावर बोलू. स्वल्पविराम चिन्हाला हिंदीत 'अल्पविराम चिन्ह' व इंग्रजीत 'काॅमा' म्हणतात.
अपूर्णविराम (:) (इंग्रजीत Colon)
जेव्हा एखादा तपशील द्यावयाचा असतो तेव्हा त्या तपशीलाच्या आधी (:) हे अपूर्णविरामाचे चिन्ह वापरतात. उदा० मुख्य ऋतू तीन आहेत : उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. हे चिन्ह अक्षराला जोडून येत नाही.
अर्धविराम ( ; ) (इंग्रजीत Semi Colon)
दोन छोटी छोटी वाक्ये जोडण्यासाठी उभयान्वयी अव्ययाचा वापर करून किंवा न करता, हे चिन्ह वापरले जाते०
उदा०
१. त्याने खूप मेहनत केली; पण त्याला योग्य ते फळ मिळाले नाही.
२. इतक्यात, आकाशात जिकडे तिकडे ढग दिसू लागले; थोड्याच वेळाने गारांचा वर्षाव होऊ लागला; त्या गारांच्या माऱ्याने डोक्यास टेंगळे आली; अशा कचाट्यात आमची मैना सापडली.
उद्गारचिह्न ( ! )
आपल्या मनातील भावना दर्शवताना हे चिन्ह वाक्यात वापरले जाते. हे चिन्ह भावनादर्शक शब्द दर्शवण्यासाठी वापरतात. उदा. अरे वा! किती सुंदर फुले आहेत! अभिनंदन! अशीच प्रगती करा. अनेकदा एकापाठोपाठ तीन उद्गारचिन्हे (!!!) वापरून उद्गारांची तीव्रता दाखवतात.
प्रश्नचिह्न ( ? ) :
एखाद्या प्रश्नार्थक वाक्यात प्रश्न विचाण्यासाठी हे चिन्ह वापरतात. हे चिन्ह वाक्यात आल्यावर तेथे प्रश्न आहे असे समजले जाते. उदा. भारताचे प्रवेशद्वार कोठे आहे? सध्याचे राज्यपाल कोण आहेत?
एकेरी अवतरणचिन्ह (‘…’)
एखाद्या शब्दास विशेष जोर देण्यासाठी दोन उलट-सुलट एकेरी अवतरणचिन्हे वापरतात. जसे — मूलध्वनींना 'वर्ण' म्हणतात. उच्चारलेला शब्द मुळाबरहुकूम-जशाच्या तसा लिहून दाखवायचा असेल तर त्या शब्दाआधी व नंतर एकेरी अवतरणचचिन्हे असतात. ही चिन्हे उलट-सुलट स्वल्पविरामांसारखी दिसतात.
दुहेरी अवतरण चिन्ह (“…”)
बोललेले वाक्य मुळाबरहुकूम-जसेच्या तसे लिहून दाखवायचे असेल त्यावेळी वाक्याच्या सुरुवातीला उलटे आणि शेवटी सुलटे 'दुहेरी अवतरण चिन्ह' येते. उदा०"तो माणूस माझा मोठा भाऊ आहे."असे शिरीष म्हणाला. जर अशी वाक्ये एकापाठोपाठ अनेक परिच्छेदांमध्ये विस्तारली असतील तर प्रत्येक परिच्छेदारंभी पहिले दुहेरी अवतरणचिन्ह येते. दुसरे अवतरण चिन्ह शेवटचा परिच्छेद जेथे संपतो तेथे येते.
संयोग चिन्ह -
जोडशब्दांदरम्यान हे चिन्ह येते. उदा० पती-पत्नी, राम-कृष्ण, गंगा-यमुना, इत्यादी. इंग्रजीत याला हायफन म्हणतात.
'ते' अथवा 'किंवा' अशा अर्थाने एक विग्रह चिन्ह येते.
उदा० १). ४-५ (चार ते सहा/चार किंवा पाच). २). कालावधी दाखविण्यासाठी. उदा० १९४७-१९५२ (४७ ते ५२) या काळात.
तारीख-महिना-वर्ष दाखविण्यासाठी विग्रह चिन्ह वापरतात. उदा० दिनांक ७-५-२०२० किंवा ७/५/२०२० रोजी.
अपसारण चिन्ह (– )
हे चिन्ह लांबीला संयोगचिन्हाच्या दुप्पट असते. (इंग्रजीत याला एम-डॅश म्हणतात.) हे (– ) एखाद्या गोष्टीचा खुलासा करावयाच्या वेळी खुलाशाच्या अगोदर वापरतात. उदा० सुमेध-माझा मामे भाऊ- आज एक चित्र काढणार होता.
शब्दाच्या संक्षिप्त रूपासमोर (. ) हे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ – डाॅक्टरसाठी डाॅ.
जुन्या काळी साहेब चे संक्षिप्त रूप लिहून दाखविण्यासाठी जास्तीचा काना वापरीत उदा० 'रावसाहेब'साठी रावसोा. अजूनही कोल्हापूरसारख्या काही जिल्ह्यांत रावसाहेबसाठी रावसोा, आप्पासाहेबसाठी आप्पासोा, तात्यासाहेबसाठी तात्यासोा असेच लिहितात.
'किंवा' या शब्दाऐवजी (/) (तिरपा डॅश) वापरतात. उदा० प्रगती पुस्तकावर वडील/पालक यांची सही आणावी.