https://www.pxfuel.com/en/free-photo-joizq |
गद्य आकलन -१
पुढील परिच्छेद वाचा, समजून घ्या, तो निबंधाच्या वहीत लिहा, त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
जंगलातील आग
गवत जाळल्यामुळे पुढील वर्षी पावसाळ्यात गवताची चांगली वाढ होते, या समजुतीतून डोंगरावरील गवताला आग लावली जाते. काही ठिकाणी मोहफूल, तेंदूपत्ता गोळा करताना स्थानिक लोकांकडूनही काही भागांत आग लावली जाते; परंतु त्यावर नियंत्रण न राखता आल्याने ही आग रौद्ररूप धारण करते.
त्यामध्ये डोंगरावरील गवत जळून नष्ट होते, त्याबरोबरच अनेक लहानमोठी झाडेही जळतात. झाडांच्या आसऱ्याला राहणारे अनेक पक्षी व प्राणी हेही आगीचे भक्ष्य बनतात. वनसंपदेबरोबरच वणव्याचा मोठा परिणाम प्राण्यांच्या अन्नसाखळीवर होत आहे. हिरव्या पाल्याच्या शोधात तृणभक्षी प्राणी जंगलाकडे वळतात; परंतु अशा वणव्यांमुळे त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो.
बर्याच वेळा डोंगरभागात फिरायला म्हणून जाणारे काही पर्यटक धूम्रपान करतात. विडी पेटवण्यासाठीची आगपेटीची जळती काडी जंगलात फेकतात. या जळत्या काडीमुळे वाळलेले गवत पेट घेते आणि पुढे त्याचे वणव्यात रूपांतर होते. या वणव्यामुळे जंगलांमध्ये पुनर्निर्मिती व चाऱ्याची उपलब्धता यांवर विपरीत परिणाम होत आहे.
प्राणी व वृक्ष वाचवण्यासाठी, वणवा लागू नये यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
प्रश्न-
- लोक डोंगरावरील गवताला आग का लावतात?
- आग रौद्ररूप धारण का करते?
- जंगलातील आगीचे दोन परिणाम सांगा.
- पर्यटकांमुळे गवताला आग कशी लागते?
- पुढील शब्दांचे अर्थ लिहा-
रौद्ररूप, संपदा, तृण, पुनर्निर्मिती, वणवा