VIII-प्रभात-कविता- किशोर बळी Prabhat Poem- Kishor Bali


प्रस्तावना-
जुने युग अंधार, अज्ञान, अंधश्रद्धा, जातिभेद इत्यादी गोष्टींनी भरलेले होते. आता नवीन युग  आहे. हे युग ज्ञान, विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोण, मानवता, लोकशाही इत्यादीवर आधारलेले आहे.  नवीन ज्ञान आणि चांगली मूल्ये यांचा स्वीकार करून आपल्या देशाचा आणि जगाचा विकास करूया.

कविता व अर्थ-

हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात
कला-गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात

अर्थ-  नव्या युगाच्या आकाशात नवीन ज्ञानाचे तेज सर्वत्र पसरले आहे. कलागुणांच्या क्षितिजावर  प्रतिभेची, नवनिर्मितीची  सकाळ झाली आहे. कलेच्या आणि विविध गुणांच्या क्षेत्रात लोक नवनवीन गोष्टी तयार करत आहेत.

भव्य पटांगण, बाग मनोहर
फुला-पाखरांचे जग सुंदर
आपुलकीचा सुवास पसरे
मनामनांतून इथे निरंतर.
गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात,
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

अर्थ- नव्या युगाचे पटांगण,  नव्या युगाचा विस्तार  भव्य ( प्रचंड मोठा) आहे.  नवीन युग सुंदर बागेसारखे आहे. अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांचे व पाखरांचे हे नवे जग अतिशय सुंदर आहे.  या नव्या जगात व या नव्या युगात आपुलकीचा सुगंध प्रत्येकाच्या मनातून सतत पसरतो आहे.  हे नवीन युग स्पर्धेचे आहे. त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी गुरुजनांची अमुल्य शिकवण मिळते आहे. त्यामुळे कलागुणांच्या अनेक क्षेत्रात लोकांची प्रतिभा उजळून निघते आहे.

पायाभरणी अस्तित्त्वाची
प्रयोगशाळा व्यक्‍तित्वाची,
तन सुदृढ, मन विशाल होई
इथे रुजवणूक त्या तत्त्वांची
विचारधारा तीच वाहते नसानसांत, रगारगांत,
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

अर्थ- या नव्या युगात मानवजातीच्या फायद्याची महत्त्वाची कामे करून  आपल्याला स्वतःचे  अस्तित्व निर्माण करायचे आहे. हे युग आपल्या व्यक्तीमत्वाच्या विकासाची प्रयोगशाळा आहे. येथे शरीर मजबूत आणि मन विशाल करणाऱ्या तत्वांची (विचारांची) पेरणी येथे केली जाते. अशी मानवीय विचारधारा शरीरभर नसानसातून आणि रगारगातून वाहते आहे. त्यामुळे कलागुणांच्या, ज्ञानाच्या क्षेत्रात नवनवीन गोष्टी तयार केल्या जात आहेत.
 
नवीन स्वप्ने, नवीन आशा
ही प्रगतीची नवपरिभाषा,
परिश्रमाने, अभ्यासाने
उन्नत बनवू आपुल्या देशा.
मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

अर्थ- नव्या युगात नवीन स्वप्ने, नवी उद्दिष्टे निर्माण होत आहेत. नव्या आशा निर्माण होत आहेत. नवी स्वप्ने, नव्या आशा पूर्ण करणे ही नव्या युगातली प्रगतीची नवीन परिभाषा (व्याख्या) आहे. त्यासाठी आम्ही भरपूर परिश्रम घेऊ, भरपूर अभ्यास करू आणि आमच्या देशाला प्रगत बनवू.  आपापसातले सगळे भेदभाव मिटवून नव्या मानवतेच्या युगात आपल्याला जायचे आहे. कलागुणांच्या क्षितिजावर नवनव्या गोष्टींची प्रभात होते आहे. 

शब्दांचा अभ्यास
====- 
ज्ञानाचे - ज्ञान - Knowledge
तेज -  प्रकाश -  light -  
युगाच्या - युग -  काळ  - कालखंड -  era - आजचे युग विज्ञानाचे आहे.  आजच्या युगात संगणक शिकलेच पाहिजे. 
कला - गुणांच्या - गुण -  कौशल्य -   skill
क्षितिजावरती -  क्षितिज -   Horizon - सूर्य क्षितिजावर उगवला.  जहाज क्षितिजावर पोचले. 
प्रतिभेची -  प्रतिभा - बुद्धी -  नवीन निर्माण करण्याची शक्ती -  talent - आपण आपल्या प्रतिभेचा पूर्ण उपयोग केला पाहिजे. 
प्रभात -  सकाळ -  morning
नभात -  नभ -  आकाश -  Sky
भव्य -  खूप मोठे  - विशाल -  very big,  vast
पटांगण -  मोठे अंगण -  big ground - मुले पटांगणावर खेळत आहेत.  आमच्या शाळेचे पटांगण खूप मोठे आहे.  
मनोहर -  सुंदर - आकर्षक -  beautiful -  attractive -  त्याचे चित्र खूप मनोहर आहे. 
पाखरांचे -  पाखरू -  पक्षी -  Bird - 
आपुलकी -  प्रेम, आपलेपणा -  affection
पसरे -  पसरणे -  spread
सुवास -  सुगंध -  fragrance
मनामनांतून -  प्रत्येक मनातून - 
निरंतर - सतत, नेहमी -  forever -  always - 
अमूल्य -  ज्याचे मूल्य करता येत नाही असे -  खूप मौल्यवान -  अनमोल -  बहुमोल -  valuable
शिकवण -  शिक्षण -  teaching -  education
स्पर्धेच्या - स्पर्धा -  competition -  स्पर्धेच्या ठिकाणी खूप मुले जमली होती. 
पायाभरणी -  पाया -  Foundation - शाळा मुलांच्या आयुष्याची पायाभरणी करते. 
अस्तित्त्व -  Existence. -  चांगला अभ्यास करून आमचे अस्तित्व घडवू. 
प्रयोगशाळा -  laboratory -  प्रयोगशाळेत खूप रसायने असतात. 
व्यक्‍तित्व  -  personality  -  आपले  व्यक्तित्व संपन्न असले पाहिजे. 
तन - शरीर -  body
सुदृढ -  सु +  दृढ -  चांगले मजबूत - निरोगी -  healthy -  strong
विशाल -  मोठे - huge
रुजवणे -  पेरणी करणे # रुजवणूक - पेरणी - Sowing -  शेतकरी शेतात धान्याची रुजवणूक करतात. 
तत्त्व - विचार -  thought -  principle 
विचारधारा - विचारांचा प्रवाह -  flow of thought -  मानवतेची विचारधारा रुजवली पाहिजे
नसानसांत -  शिरांतून - through veins  and arteries
रगारगांत -  पूर्ण शरीरात -  
स्वप्ने - इच्छा -  dreams - ambitions 
आशा -  इच्छा - will -  ambitions 
नवपरिभाषा -  नवीन व्याख्या -  new definition
परिश्रमाने -  परिश्रम -  मेहनत -  effort -  चांगले गुण मिळवण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजे. 
अभ्यासाने - अभ्यास -  सतत प्रयत्न -  सराव - practice -  continuous efforts
उन्नत -  प्रगत - विकसित -  उंच -  श्रेष्ठ -  developed - उन्नत विचाराने देशाची प्रगती होते. 
मिटवून -  मिटवणे - पुसून टाकणे - रद्द करणे -  eradicate -  आम्ही अंधश्रद्धा मिटवून टाकू. 
भेद -  फरक -  differences -  आम्ही माणसामाणसात भेद करणार नाही
मानवतेच्या -  मानवता -  माणुसकी -  humanity -  Humanism

स्वाध्याय - पृष्ठ- 7, प्र. 1 ते 6 
खेळू या शब्दांशी - अ, आ. 

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी