खालील मुद्द्यांवरून गोष्ट तयार करा.
मुद्दे - शाळेत जाणारा कष्टाळू - प्रामाणिक मुलगा - वाईट मित्रांची संगत - शिक्षकांना काळजी - मुलाला घेऊन बाजारात फेरफटका - उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी - एक खराब झालेला आंबा - दोन दिवसांनी पाहणी - नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब - संदेश.
|
चित्र- वेबदुनिया : आदर्श शिक्षक |
पण मध्येच त्याला वाईट मित्रांची संगत लागली. ते कुठून कुठून पैसे घेऊन येत. भलत्यासलत्या गोष्टींवर खर्च करत. त्यांच्यासोबत चांगले चांगले खायला प्यायला मिळाल्यामुळे राजूलाही त्यांची मैत्री आवडू लागली. त्यांच्याबरोबर राहून राजूचे वागणे-बोलणे बिघडले. त्याचे अभ्यासावरचं लक्ष उठले. परीक्षेतील मार्क जेमतेम पास होईल एवढे घसरले. एकदा तर त्याने वर्गातील एका मुलाचे शंभर रुपये चोरले. पण शिक्षकांच्या तपासणीत ते त्याच्या पिशवीत सापडले.
त्याच्या या अधोगतीमुळे त्याच्या शिक्षकांना त्याची अतिशय काळजी वाटू लागली. एकदा ते त्याला बाजारात फेरफटका मारायला घेऊन गेले. बाजारात त्यांनी उत्तम आंब्यांची खरेदी केली. त्यात एक खराब झालेला आंबा राजूच्या देखत ठेवून दिला. ती आंब्याची पिशवी राजूला त्याच्या घरी ठेवायला सांगितली. दोन दिवसांनी शिक्षकांनी राजूला घेऊन त्या पिशवीतील आंब्यांची पाहणी केली. एका नासक्या आंब्यामुळे बाकीचे सर्व आंबे खराब झाले होते. वाईट संगतीमुळे चांगल्या मुलांची अधोगती होते, त्यांचे जीवन वाया जाते- हे शिक्षकांनी राजूला आंब्याच्या उदाहरणावरून पटवून दिले. राजूलाही ते मनोमन पटले. राजूने वाईट मुलांची संगत सोडायची व चांगल्या मुलांची संगत धरायची असा निश्चय केला.
संदेश- वाईट संगतीमुळे चांगल्या मुलांची अधोगती होते, त्यांचे जीवन वाया जाते. (221 शब्द)
==== X ====
करावे तसे भरावे
"तुझ्यासारख्या चांगल्या हुशार मुलाला अशी चोरी करणे शोभते काय रे?" सुनील सर राजूला वैतागून म्हणाले.
"मी नाही चोरी केली सर. कुणीतरी माझ्या पिशवीत ते रुपये ठेवलेत, मला बदनाम करण्यासाठी." राजूने निडरपणे प्रत्युत्तर दिले.
"अरे, खिडकीतून दोन पोरांनी बघितलंय- तुला चोरी करताना. वरून खोटं बोलतोस! मधल्या सुट्टीत तूच वर्गात गेला होतास हे शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेर्यानेपण टिपले आहे." सरांच्या खुलाशाने राजू वरमला. त्याने चूक कबूल केली. प्रकरण मुख्याध्यापकांकडे गेले.
या प्रसंगाने सुनील सर मात्र अतिशय दुःखी झाले. राजू हा अतिशय मेहनती, कष्टाळू, प्रामाणिक व हुशार विद्यार्थी होता. वर्गात नेहमी वरचा नंबर असायचा त्याचा. मागील वर्षी शाळेत सापडलेली सोन्याची अंगठी सुद्धा त्याने प्रामाणिकपणे सरांना आणून दिली होती.
सरांनी इतर विद्यार्थ्यांकडून राजूची माहिती मिळवली. राजू हा कोणत्यातरी गुंड टोळक्याच्या नादात लागला होता. ती गुंड मुले चोर्या, मारामाऱ्या, नशा वगैरे करायची. त्यांच्या नादी लागल्यापासून राजूचे अभ्यासावरील लक्ष उडाले, त्याचे गुण कमालीचे घसरले. त्याची भाषा आणि वागणे बिघडले. हे कळल्यावर सरांनी काहीतरी करायचे ठरवले.
दुसऱ्या दिवशी ते राजूला घेऊन बाजारात गेले. तेथे त्यांनी चांगल्या आंब्यांची खरेदी केली. आंब्याची पिशवी राजूच्या हातात दिली. त्या पिशवीत एक नासका आंबा ठेवायला त्यांनी राजूला सांगितले. त्या पिशवीला चांगली गाठ बांधून राजूच्या घरी ठेवून दिली. दोन दिवसांनी ते राजूच्या घरी गेले. त्यांनी राजूला पिशवी उघडायला सांगितली. पिशवीतून एकदम दुर्गंध आला.
"हे काय झाले राजू? मी तुला किती चांगले आंबे दिले होते?" सरांनी वाकडातिकडा चेहरा करत विचारले.
"सर, त्यात एक नासका आंबा ठेवला होता ना? त्याचाच परिणाम दिसतोय सर!" राजूने साळसूदपणे उत्तर दिले.
"राजू, एका नासक्या आंब्याने सर्व चांगल्या आंब्याची माती केली रे! सगळे किडे पडलेत बघ! आणि तुझ्यासारखा चांगला मुलगा इतर सडक्या मुलांच्या टोळक्यात जाऊन बसला? तुझ्या आयुष्याची अशीच माती नाही होणार का रे? तुझे भविष्य सडून नाही जाणार का रे?" सर काकुळतीला येऊन म्हणाले.
राजूला स्वतःचे उध्वस्त भविष्य दिसू लागले. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
"मला माफ करा सर. मी माझे आयुष्य सडू देणार नाही." सरांच्या पायावर लोटांगण घालून राजू पुन्हा पुन्हा म्हणू लागला.
"मी कोण तुला माफ करणार? जसे करावे तसे भरावे. तू चांगली संगत ठेवलीस, चांगली कामे केलीस तर तुझे आयुष्य तुला माफ करेल. तुला त्याची चांगली फळे मिळतील."
"आईशप्पथ, खूप चांगला बनवून दाखवील सर मी." राजूच्या डोळ्यात नवा आत्मविश्वास लखलखत होता.
संदेश- शिक्षक सुसंस्कार करून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल बनवू शकतात. (351 शब्द)
=== X ===
खालील मुद्द्यांच्या आधारे कथा लिहा.
आंतरशालेय क्रीडास्पर्धा - धावण्याची स्पर्धा - शाळेतर्फे वरदचा सहभाग - वरद उत्तम धावपटू - सराव - उत्तम धावपटू तनयशी स्पर्धा - प्रत्यक्ष स्पर्धा - चुरशीची स्पर्धा - अचानक तनयचा पाय मुरगळणे - स्पर्धा सोडून वरदचे मदतीला धावणे - स्पर्धा हरूनही वरदचे कौतुक