X- संतवाणी- योगी सर्वकाळ सुखदाता- संत एकनाथ

कवितेची प्रस्तावना- 

पाणी हे आपले जीवन आहे, त्याशिवाय आपण जगू शकत नाही, पाणी आपल्यासाठी अत्यंत श्रेष्ठ आहे. परंतु नैतिक, प्रामाणिक, निस्वार्थी, निर्लोभी इत्यादी गुण असलेला योगी पुरुष हा पाण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे हे विविध दृष्टांत देऊन संत एकनाथ यांनी सांगितले आहे. 

Thanks Wikipedia


योग आणि योगी

=========
भारतीय संस्कृतीत योग हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने आला आहे.
योग: कर्मसु कौशलम् | आपल्या कर्मात कुशलता आणणे म्हणजे योग. आपले काम जास्तीत जास्त कौशल्याने (Skillfully) जास्तीत जास्त चांगले करणे म्हणजे योग.
योगः चित्त-वृत्ति निरोधः | आपल्या चित्तवृत्तीला (मनाला) नियंत्रणात ठेवणे म्हणजे योग.
अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य ( इंद्रियांवर संयम ठेवणे) आणि अपरिग्रह ( आवश्‍यकतेपेक्षा वस्तू- संपत्ती यांचा साठा न करणे) या तत्त्वांचे पालन करणे म्हणजे योग. या पाच तत्त्वांना यम असे म्हटले आहे.
शरीर आणि मन स्वच्छ ठेवणे, संतुष्ट आणि प्रसन्न राहणे, स्वयंशिस्त पाळणे, आत्मचिंतन करणे, ईश्वर चिंतन करणे या पाच नियमांचे पालन करणे म्हणजे योग.
भरपूर ज्ञान मिळवणे म्हणजे योग. त्यासाठी ज्ञानयोग हा शब्द वापरला आहे. "न हि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते" म्हणजे ज्ञानासारखे पवित्र इथे काहीही नाही असे गीतेत (४.३८) सांगितले आहे.
इ.स.पू. 150 मध्ये पतंजली योगशास्त्रात अष्टांग योग सांगितला आहे. याप्रमाणे इ.स.पू. 500 मध्ये गौतम बुद्धाने सांगितलेल्या अष्टांग मार्ग सांगितलेला आहे. अष्टांग मार्गामध्ये "ईश्वर चिंतन करणे" ही गोष्ट मात्र नाही.
योगी म्हणजे योग आचरणारा पुरुष होय. योग आचरणार्‍या स्त्रीस योगिनी म्हणतात.

शब्दांचा अभ्यास - 

पांखोवा पंखांचे पूर्ण आच्छादन/ जेवीं ज्याप्रमाणे / मृदुत्व मृदू ममत्व, महत्त्व, मातृत्व / क्षाळी क्षाळणे धुणे क्षालन, प्रक्षालन, स्नान करणे / सबाह्य, स + बाह्य, आतून आणि बाहेरूनसुद्धा / निर्मळ, नि: + मळ, मळ नसलेला, शुद्ध / पाणी, जीवन, उदक, जळ / सुखदाता दाता= देणारा, / तृषितें, तृषा=तहान, तृषार्त= तृषित= तहानलेला / विकृती, बिघाड, नाश, / स्वानंदतृप्ती स्व+ आनंद, तृप्ती= समाधान / मधुरता, माधुर्य, गोडपणा / रसना= जीभ / तत्त्वतां तत्व= विचार, नियम Principle / सर्वेंद्रिय सर्व+ इंद्रिय / अध:पतन अधो= खाली / निवणे शांत होणे, तृप्त होणे / सकळ सर्व / इहलोक, मृत्युलोक, पृथ्वीवरील जीवन / श्रवण ऐकणे / कीर्तन, कीर्ति-वर्णन, यशोगान, लोक वांग्मयाचा एक प्रकार निजज्ञानें उद्धरी

कवितेचा अर्थ -

जेवीं चंद्रकिरण चकोरांसी । पांखोवा जेवीं पिलियांसी ।
जीवन जैसे कां जीवांसी । तेवीं सर्वांसी मृदुत्व ॥
अर्थ- चकोर पक्षी पौर्णिमेच्या चंद्राचे किरण प्राशन करून जगतो. म्हणजे चंद्राचे किरण हे त्याचे जीवन आहे. पक्षिणीच्या पंखाखाली तिची पिल्ले सुरक्षित असतात. पाणी सर्वांना जीवन देते. त्याप्रमाणे योगी सुद्धा हळुवारपणे सुरक्षित आणि सुखी जीवन देतो.

जळ वरिवरी क्षाळी मळ । योगिया सबाह्य करी निर्मळ ।
उदक सुखी करी एक वेळ । योगी सर्वकाळ सुखदाता ।।
अर्थ- पाणी हे शरीरावरील मळ साफ करते; परंतु योगी पुरुषामुळे लोक आतून-बाहेरून निर्मळ, शुद्ध होतात. पाण्यामुळे आपल्याला एकदा सुख मिळते; परंतु योगी पुरुष सर्वकाळ सुख देतो.

उदकाचें सुख तें किती । सवेंचि क्षणें तृषितें होती ।
योगिया दे स्वानंदतृप्ती । सुखासी विकृती पैं नाही ।॥।
अर्थ- पाण्यामुळे आपल्याला काही वेळ सुख मिळते. पाणी पिल्यानंतर काही वेळाने पुन्हा तहान लागते. योग्यामुळे आपल्याला स्वानंद मिळून आपले समाधान होते. योग्यामुळे मिळालेला आनंद नष्ट किंवा विकृत होत नाही.

उदकाची जे मधुरता । ते रसनेसीचि तत्त्वतां ।
योगियांचे गोडपण पाहतां । होय निवविता सर्वेंद्रियां ।।
अर्थ- पाण्याची गोडी फक्त जिभेला तृप्त करते. परंतु योग्याच्या गोडपणामुळे सर्व इंद्रियांना समाधान मिळते.

मेघमुखें अध:पतन । उदकाचें देखोनि जाण ।
अध:पातें निवती जन । अन्नदान सकळांसी ।
अर्थ- ढगातून पाणी जमिनीवर पडते, त्यामुळे अन्नधान्य पिकते, पृथ्वीवरील जीवांना खायला-प्यायला मिळते. त्यामुळे सर्वजण संतुष्ट होतात.

तैसे योगियासी खालुतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें ।
जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ।॥
अर्थ- त्याचप्रमाणे योगी पुरुषसुद्धा जणू काही स्वर्गलोकांतून खाली येतात व इहलोकी ( पृथ्वीवर) जन्म घेतात. लोकांना कीर्तनातून उपदेश करून संतुष्ट करतात. लोकांना आत्मज्ञान देऊन त्यांचा उद्धार करतात.

एकनाथी भागवत' शासकीय प्रत : अ. ७.
ओव्या ४६५ ते ४६८, ४७३ ते ४७४

अर्थ व स्पष्टीकरण 

तैसे योगियासी खालुतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें ।
जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ।॥

उत्तर-
या ओळी “योगी सर्वकाळ सुखदाता” या ओव्यातून घेतल्या आहेत. हा अभंग संत एकनाथ यांनी लिहिला आहे. यामध्ये विविध दृष्टांत देऊन योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व सांगितले आहे.

पाणी हे पृथ्वीवरील सजीवांचे जीवन आहे. पाण्याशिवाय आपण स्वच्छ राहू शकत नाही, जिवंत राहू शकत नाही. या प्रकारे पाण्याचे महत्व प्रचंड आहे. परंतु संत एकनाथ महाराज म्हणतात- योगी पुरुषाचे महत्व पाण्यापेक्षाही बरेच जास्त आहे. पाणी ज्याप्रमाणे ढगातून खाली येते व लोकांचा उद्धार करते. त्याप्रमाणे योगी पुरुष वरच्या स्वर्गीय स्थानातून खाली पृथ्वीवर जन्म घेतात. कीर्तना सारख्या माध्यमांतून मानवीय मूल्यांचा उपदेश करतात. लोकांना संतुष्ट करतात. आत्मज्ञान देऊन लोकांचा उद्धार करतात.

ढगातून खाली येणार्‍या पाण्यांचे रुपक वापरुन योगी पुरुष इहलोकी येतात, व लोकांचे भले करतात ही उच्च दर्जाची कल्पना संत एकनाथ यांनी केली आहे. येणे, पावणे, कीर्तने, निजज्ञाने या शब्दांतून सुंदर नाद निर्माण झाला आहे. यात साधी, रसाळ, चित्रदर्शी, अलंकारिक भाषा वापरली आहे।

कृती स्वाध्याय 
1 ते 5 

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी