सर्वात्मका शिवसुंदरा- शब्द, प्रस्तावना, अर्थ

प्रस्तावना-
सृष्टीतील गूढ गोष्टींची कारणे मानवाला समजली नाही, तेव्हा त्या गोष्टींच्या मागे अद्भुत शक्ती असावी अशी कल्पना माणसाने केली. या कल्पनेतून देव-ईश्वर यांच्या विविध कल्पना निर्माण झाल्या. या कवितेत कवी कुसुमाग्रज यांनी परमेश्वराची एक सुंदर कल्पना आपल्यासमोर ठेवली आहे. या कवितेतील परमेश्वर सर्वत्र राहणारा, सर्वांमध्ये वसणारा, चांगल्या गोष्टीं करणारा, वाईट गोष्टी दूर करणारा, अडचणींमध्ये मदत करणारा अशा प्रकारचा आहे.




महत्वाचे शब्द. पुढील शब्दांचा अभ्यास करा

सर्वात्मका - सर्व+ आत्मका - सर्वांच्या ठिकाणी असलेला
शिव - पवित्र
सुंदरा - वागणे, विचार, दिसणे या सर्व बाबतीत सुंदर असलेल्या
अभिवादन - नमस्कार
सुमन - सु + मन - चांगले मन, फूल
तारा/ तारे- तार्‍यां सामान्य रूप ( वाऱ्या, घोड्या, वाड्या .... )
सद्धर्म सत् + धर्म- चांगला धर्म.
वसणे- वसतोस ( जातोस , बसतोस, श्रमतोस, पुसतोस, धावतोस .... )
राबसी - राबणे - कष्ट करणे
श्रमिक - कामगार
सवे - सोबत
रंजले - दुःखीकष्टी
गांजले - इतरानी त्रास दिलेले
आसवे पुसणे - दुःख दूर करणे
न्यायार्थ - न्याय+ अर्थ (ध्येयार्थ, ज्ञानार्थ, देशार्थ .... )
तपती - प्रयत्न करतात.
साधना - तपश्चर्या करणे, खूप प्रयत्न करणे.
सृजन - नवीन निर्माण करणे, सृजनत्व - नवीन निर्मिती करण्याचा गुण
नित- सतत
स्वीकार तिमिर तेज गगन चोहीकडे जाणीव स्वार्थाविना पावन तम करुणा पावले

कविता व अर्थ-

सर्वात्मका, शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना ।।धृ।।
अर्थ- सर्व सजीवांच्या आत्म्यामध्ये भरून असलेल्या पवित्र व सुंदर अशा ईश्वरा तू आमच्या नमस्काराचा स्वीकार कर. आमच्या जीवनाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जा.

सुमनात तू, गगनात तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
त्यांच्या मध्ये वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ।।
अर्थ- तू चांगल्या मनामध्ये राहतोस, तू फुलांमध्ये राहतोस, तू आकाशामध्ये राहतोस. तेजस्वी ताऱ्यांमध्ये तू फुलतोस. जगात ज्या ज्या चांगल्या वागण्याच्या पद्धती आहेत त्यात तू राहतोस. तुझी रूपे सर्वत्र आहे त्याची जाणीव माझ्या मनाला आहे.

श्रमतोस तू शेतांमध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन्‌ गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थाविना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना ।।
अर्थ- तू शेतांमध्ये शेतकरी, शेतमजूर होऊन मेहनत करतोस. तू श्रमिक, कामगार यांच्यासोबत कष्ट करतोस. जे दुःखीकष्टी आहेत, ज्यांना इतरांनी छळले आहे त्यांची आसवे तू पुसतोस. स्वतःचा स्वार्थ न बघता जेथे लोक सेवा करतात तेथे तू तुझी पवित्र पावले घेऊन येतोस.

न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमी चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना ।।
अर्थ- न्याय मिळवण्यासाठी जे जीवनाच्या रणांगणात लढतात, त्यांच्या हातातली तलवार तू होतोस. स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी जे लोक अंधारातही चालत राहतात त्यांच्या मनामध्ये प्रेरणा रुपी दिवा बनवून तू तेवत राहतोस. ज्ञान मिळवण्यासाठी जे ऋषिमुनींनी सारखे सतत प्रयत्न करतात, त्यांची साधना म्हणजे त्यांचे प्रयत्न तू होतोस.

करुणाकरा, करुणा तुझी
असता मला भय कोठले ?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना ।।
अर्थ- दया- करुणा यांनी भरलेल्या परमेश्वरा तुझी करुणा माझ्यावर असताना मला कुठलीही भीती असणार नाही. माझ्या मार्गावर चालताना तुझी पावले पाहून मी पुढे जात राहील. भीती न बाळगता नवीन निर्मिती करण्याचा गुण माझ्या हृदयामध्ये तू सतत जागृत ठेवतोस.

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी