VIII- प्रभात

ऐका. वाचा. म्हणा


हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात
कला-गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

भव्य पटांगण, बाग मनोहर
फुला-पाखरांचे जग सुंदर
आपुलकीचा सुवास पसरे
मनामनांतून इथे निरंतर.
गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात,
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

पायाभरणी अस्तित्त्वाची
प्रयोगशाळा व्यक्‍तित्वाची,
तन सुदृढ, मन विशाल होई
इथे रुजवणूक त्या तत्त्वांची
विचारधारा तीच वाहते नसानसांत, रगारगांत,
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

नवीन स्वप्ने, नवीन आशा
ही प्रगतीची नवपरिभाषा,
परिश्रमाने, अभ्यासाने
उन्नत बनवू आपुल्या देशा.
मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात
कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात.

किशोर बळी

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी