IX- भेटीलागी जीवा लागलीसे आस

प्रस्तावना-

“भेटीलागी जीवा” हा अभंग संत तुकाराम यांनी लिहिला आहे. यात त्यांची विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केली आहे. 


अर्थ-



भेटीलागी जीवा लागलीसे आस,
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥१॥
अर्थ- संत तुकाराम विठ्ठलाला म्हणतात, तुझ्या भेटीची मला तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची वाट पाहत आहे.

पूर्णिमेचा चंद्रमा चाकोरा जीवन,
तैसे माझे मन वाट पाही ॥२॥
अर्थ- चकोर पक्षी पौर्णिमेचे चांदणे प्राशन करून जगतो. पौर्णिमेचा चंद्र हा चकोर पक्षाचे जीवन आहे. त्यामुळे तो पौर्णिमेच्या चंद्राची अत्यंत आतुरतेने वाट पाहतो. त्याच प्रमाणे मीसुद्धा विठ्ठलाची वाट पाहत आहे.

दिवाळीच्या मुळा लेकी आसावली,
पाहतसे वाटुली पंढरीची ॥३॥
अर्थ- सासरी गेलेल्या मुली माहेरी जाता यावे म्हणून दिवाळीची वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे पंढरपूरला जाण्याची मी तीव्रतेने वाट पाहत आहे.

भुकेलिया बाळ अति शोक करी
वाट पाहे उरि माऊलीची||४||
अर्थ- लहान बाळ भुकेने व्याकुळ झाला आहे. काहीतरी खायला प्यायला मिळावे म्हणून तो आईसाठी अतिशय शोक करतो. त्याप्रमाणे मी सुद्धा तुझी व्याकुळतेने वाट पाहत आहे.

तुका म्हणे मज लागलीसे भूक,
धावूनि श्रीमुख दावी देवा ॥५॥
अर्थ- संत तुकाराम म्हणतात, लहान बाळाप्रमाणे मलासुद्धा विठ्ठलाला पाहण्याची अतिशय भूक लागली आहे, तीव्र इच्छा होत आहे. म्हणून हे विठ्ठला तू धावून ये व मला तुझ्या श्रीमुखाचे दर्शन दे.

शब्दांचा अभ्यास-

भेट भेटी / लागी / जीव /
लागलीसे / आस / पाहे/
पूर्णिमा पौर्णिमा पौर्णिमे / चंद्रमा / चाकोर / जीवन / तैसे / पाही
मूळ मुळा / लेक लेकी / आसावली
वाट वाटुली
भूक भुकेलिया / शोक / करी
ऊर उरी / माऊली
मज / लागलीसे / भूक
श्रीमुख / दावी
प्राशन करणे / व्याकुळ व्याकुळता / आतुर आतुरता /

स्वाध्याय-

1- लिहा 
2- लिहा 
3- लिहा

 ओळींचा अर्थ / संदर्भासह स्पष्टीकरण / काव्यपंक्तीचे रसग्रहण
( पायर्‍या - संदर्भ, अर्थ व स्पष्टीकरण विशेष )

प्रश्न- खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा

पौर्णिमेचा चंद्रमा चाकोरा जीवन,
तैसे माझे मन वाट पाही ॥२॥

उत्तर- या ओळी “भेटीलागी जीवा” या अभंगातून घेतल्या आहेत. हा अभंग संत तुकाराम यांनी लिहिला आहे. यामध्ये त्यांनी विविध दृष्टांत देऊन विठ्ठलाच्या भेटीची ओढ स्पष्ट केली आहे

चकोर पक्षी हा पौर्णिमेच्या चंद्राचे किरण पिऊन जगतो, अशी काल्पनिक गोष्ट आहे. पौर्णिमेचा चंद्र हेच चकोर पक्षाचे जीवन आहे. त्यामुळे तो पौर्णिमेच्या चंद्राची अत्यंत तीव्रतेने वाट पाहतो. त्याच प्रकारे विठ्ठल हे संत तुकारामांचे जीवन आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला शिवाय त्यांचे जगणे अशक्य आहे. म्हणून चकोर पक्ष्यासारखे ते विठ्ठलाच्या दर्शनाची अत्यंत तीव्रतेने वाट पहात आहेत.

स्वतःची विठ्ठल दर्शनाची तीव्र इच्छा व्यक्त करण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी चकोर पक्ष्याचा समर्पक दृष्टांत दिला आहे. या अभंगाची भाषा साधी, सरळ, रसाळ व आकर्षक आहे.


उपक्रम-

1- नको देवराया, अंत आता पाहू
संत-कवयित्री कान्होपात्रा

नको देवराया, अंत आता पाहू ।
प्राण हा सवर्था, जाऊ पाहे ॥१॥

हरिणीचे पाडस, व्याघ्रे धरियेले ।
मजलागी जाहले तैसे देवा ॥२॥

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी ।
धावे हो जननी विठाबाई ॥३॥

मोकलूनी आस, जाहले उदास ।
घेई कान्होपात्रेस हृदयात ॥४॥



2- जलाविण मासा
-संत कवयित्रीबहिणाबाई

जलाविण मासा जैसा तऴमऴी ।
चातक भूतऴी मेघ इच्छी ।।1।।

तैसे भक्तीलागी कऴवऴे मऩ ।
भक्ति हे निर्वाण तेच खर् ।।2।। 
 
एकुलता पुञ सापडे वैरीया ।
कुरंग हा ठाया पारधीचे ।।3।।

पतिव्रता पतियोगे तडफडी ।
भ्रमर प्राण सोडी पुष्पावीण ।।4।।

तृषाक्रांत जैसा इच्छित जीवन ।
चकोर हा जाण चंद्रामृता।।५।। 

बहिणी म्हणे तैसी आवडे हरिभक्ति।
तेव्हा चितवृत्ति वोळखावी।।६।।


पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी