आम्ही चालवू हा पुढे वारसा- शब्दांचा अभ्यास व कवितेचा अर्थ

प्रस्तावना-

गुरू या शब्दाचा अर्थ बराच मोठा आहे. गुरु म्हणजे आपल्याला ज्ञान देणारा. किंवा ज्यांच्याकडून आपण ज्ञान घेतो त्यांना आपण गुरु म्हणतो. गुरु आपल्यापेक्षा वयाने मोठा असू शकतो, गुरु आपल्यापेक्षा वयाने लहानही असू शकतो. गुरु जवळ असू शकतो, गुरु दूर असू शकतो. आई ही पहिली गुरु आहे, असे म्हटले जाते. ग्रंथ हेच गुरु, निसर्ग हा मोठा गुरु आहे... अशी वाक्य आपण ऐकत असतो. म्हणजेच गुरु सजीव असू शकतो, तसेच गुरु निर्जीवही असू शकतो. इंटरनेट, कम्प्युटर हे आपले गुरु बनले आहेत. त्यांच्या पासून चांगल्या गोष्टी शिकायच्या असतात. तसेच वाईट शिकवणुकी पासून दूरही राहायचे असते.


महत्वाचे शब्द / शब्दांचा अभ्यास

वसा / ज्ञानरूपी वसा / वारसा / स्नेह स्नेही / माऊली / कल्पवृक्ष / तळ तळी / कवडसा / अंकुर / फलद्रुप / धीरता शूरता वीरता नम्रता / विद्येसवे (सवे) / ध्यास / दुष्ट / शासन / सज्जन (सत् + जन) / पालन / मानसी / ठसा / त्याग / फळास येणे / पुण्यवंत / भल्या (भला माणूस)

अर्थ-

गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा

अर्थ- जेथून आम्ही ज्ञान मिळवतो, त्या सर्व गोष्टी आमच्या गुरु होत. गुरूने आम्हाला ज्ञानाचे व्रत ( नियम) दिलेले आहे. आम्ही त्या ज्ञानाचा वारसा पुढे चालवू.

पिता-बंधू-स्नेही तुम्ही माऊली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य आम्हां दिला कवडसा

अर्थ- गुरु आम्हाला वडील, भाऊ- बहीण, मित्र व आई यांच्या प्रमाणे आधार आणि प्रेम देतात. कल्पवृक्षा च्या खाली आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे म्हणतात. गुरु हे त्या कल्पवृक्षाच्या खालील गार सावली प्रमाणे आहेत. गुरूजवळ सूर्याप्रमाणे प्रचंड ज्ञान आहे. त्यातील एक छोटासा कवडसा आम्हाला मिळाला आहे.

जिथे काल अंकुर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा

अर्थ- गुरूने काल ( पूर्वी) विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानरूपी बीज लावले, त्या बीजाला अंकुर फुटला, त्याची मोठी वेल झाली. आज त्या वेलीवर फुले आली आहेत आणि परिसर सुंदर व सुगंधी करत आहेत. काही बियांचे वृक्ष झालेत. त्यांना ज्ञानाची भरपूर फळे लागली आहेत.

शिकू धीरता, शूरता, वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा

अर्थ- गुरूने दिलेल्या ज्ञानातून आम्ही धैर्य, शौर्य व पराक्रम शिकणार आहोत. कितीही विद्या मिळवली तरी नम्रतेने वागणार आहोत. अशी चांगली व्यक्ती बनण्याचा ध्यास आम्हाला लागला पाहिजे.

जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा

अर्थ- दुष्ट, गुंड, भ्रष्ट, समाजघातक लोकांना कायद्याच्या योग्य पद्धतीने आम्ही शासन करू, शिक्षा देऊ. गुणी लोकांच्या , सज्जनांच्या चांगल्या गोष्टीचे पालन करू. आमच्या मनावर हा विचार पक्का झाला आहे.

तुझी त्याग सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ती राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा

अर्थ- गुरुवर्यानो, ज्ञान देण्याविषयीचा तुमचा त्याग, तुमची सेवा चांगल्या प्रकारे फळाला येईल. त्यामुळे तुमची किर्ती सर्वत्र पसरत राहील. तुम्ही चांगले काम करणारे (पुण्यवंत) आहात, तुम्ही महान आहात.

  जगदीश खेबुडकर,

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी