IX- Poem 1, सर्वात्मका शिवसुंदरा- 2

छान छान बाळांनो,

“सर्वात्मका शिवसुंदरा” या कवितेची अतिशय चांगली MP3 ध्वनिफीत (Audio File) श्री. राजाराम काटवटे सर व श्री. रंगनाथ कैले सर यांच्याकडून मिळाली आहे. दोन्ही MP3 फाईल सारख्याच आहेत. जी फाईल प्ले होऊ शकेल ती ऐका. दोन्हींची लिंक खाली दिली आहे. त्यावर क्लिक केल्यास गीत गायन सुरू होईल. यातील वाद्य, संगीत, चाल व स्पष्टता अत्यंत आकर्षक आहे. तुम्हाला नक्की आवडेल. आणि हे गाणे म्हणताना तुम्हाला अतिशय आनंद होईल.





या गाण्याविषयी अधिक स्पष्टीकरण तुम्हाला नंतर देऊ. तोपर्यंत हे गाणे तालासुरात म्हणण्याचा सराव करा. हे गाणे तालासुरात म्हणून मोबाईलवर रेकॉर्ड करून आम्हाला पाठवण्याचा स्वाध्याय (Assignment) तुम्हाला काही दिवसांनी देणार आहोत. पुस्तकात बघून ही कविता म्हटली तरी चालेल. पण छान तालासुरात म्हणायला हवी.

तुम्हाला रोज मराठीचा छोटासा व तुम्हाला आवडेल असा पाठ दररोज देण्याचा प्रयत्न करू. मग चला तर वर दिलेले काम पूर्ण करा.

तुमच्या वाचनासाठी व सरावासाठी (Practice) संपूर्ण कविता खाली देत आहे.

सर्वात्मका शिवसुंदरा

सर्वात्मका, शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना
तिमिरातुनी तेजाकडे, प्रभु, आमुच्या ने जीवना ।।धृ।।

सुमनात तू, गगनात तू
तार्‍यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामध्ये
त्यांच्या मध्ये वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ।।

श्रमतोस तू शेतांमध्ये
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले अन्‌ गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थाविना सेवा जिथे तेथे तुझे पद पावना ।।

न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमी चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी, होतोस त्या तू साधना ।।

करुणाकरा, करुणा तुझी
असता मला भय कोठले ?
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना ।।

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी