देह मंदिर, चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, कवी- वसंत बापट


बाळांनो,
आज सुप्रसिद्ध कवी वसंत बापट यांची अतिशय गाजलेली कविता “देह मंदिर, चित्त मंदिर” ही आपण शिकणार आहोत. तुम्हाला ही कविता सहज गाता येईल.

देह मंदिर, चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना
कवी- वसंत बापट
================


देह मंदिर, चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना
अर्थ- आपले शरीर पवित्र आहे. ( मंदिर= पवित्र ठिकाण). त्यातील चित्त (मन) हेसुद्धा पवित्र आहे. या ठिकाणी सतत एक प्रार्थना असावी, सतत एक विचार असावा. त्यात सत्य, सुंदर व पवित्र या मूल्यांचे  ( मूल्य=Value) सतत पालन केले जावे.

दुःखितांचे दुःख जावो, ही मनाची कामना
वेदना जाणावयाला, जागवू संवेदना
दुर्बळाच्या रक्षणाला, पौरुषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना
अर्थ- दुःखी लोकांचे दुःख नष्ट होवो, अशी इच्छा ( कामना) या मनात नेहमी ठेवू. दुसऱ्यांच्या वेदना/ दुःख आपल्याला जाणवले पाहिजे, समजले पाहिजे यासाठी संवेदना (Sympathy) जाग्या करू. लोकांचे रक्षण करण्यासाठी आम्ही पराक्रमाची साधना करू. त्यात सत्य, सुंदर व पवित्र या मूल्यांचे सतत पालन करू.

जीवनी नव तेज राहो, अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो, मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना
अर्थ- आमच्या जीवनात नवीन तेज राहो, आमच्या मनात दुसऱ्यां विषयीच्या भावना जागृत राहो. मानवाच्या जीवनात जी सुंदर मूल्ये आहेत त्याकडे आमचे लक्ष लागून राहो. सत्य शोधत राहण्यासाठी आमच्यामध्ये शौर्य आणि धैर्य निर्माण होवो. सत्य, सुंदर व पवित्र गोष्टींचे आमच्याकडून सतत पालन होवो.

भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना
मानवाच्या एकतेची, पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू, बधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना
अर्थ- यासाठी आपल्यामधील सर्व भेद आपण नष्ट करू. एकमेकांमधील वैर सुद्धा विसरून जाऊ. सर्व मानव एक आहे ही कल्पना पूर्ण करू. आम्ही मुक्त विचारांचे जीवन जगू. आम्ही फक्त बंधुभावाच्या बंधनाचे पालन करू. आमचे वागणे नेहमी सत्य, सुंदर व पवित्र विचारांनी परिपूर्ण ठेवू.
===
वसंत बापट यांचे नेहमीचे नाव- विश्‍वनाथ वामन बापट असे होते. पण ते वसंत बापट या नावाने लेखन करीत व याच नावाने ते प्रसिद्ध होते.  (जन्म- २५ जुलै, इ.स. १९२२ - मृत्यू- १७ सप्टेंबर, इ.स. २००२)
ते तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. इ.स. १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता. ऑगस्ट १९४३ पासून जानेवारी १९४५ पर्यंत ते तुरुंगात होते. ते इ.स. १९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षही होते