मला कोरोनाचा संसर्ग झाला तर? (कल्पनात्मक निबंध)

विद्यार्थ्यांनो,

“ मला पंख असते तर?” हा निबंध तुम्ही केव्हा ना केव्हा तरी लिहिला किंवा वाचला असेलच. आपल्याला पंख असते तर काय काय मजा केली असती, याची सुंदर सुंदर स्वप्ने सुद्धा तुम्ही बघितली असतील. या प्रकारेच परीक्षा नसत्या तर?, आई संपावर गेली तर?, मी मुख्याध्यापक झालो तर?, झाडे बोलू लागली तर? ... अशा प्रकारचे निबंध तुम्हाला नक्कीच माहीत असतील. या निबंधांना म्हणतात " कल्पनात्मक निबंध" किंवा "कल्पनाप्रधान निबंध"
अशा निबंधात आपल्याला छान छान कल्पना करता येतात. पण आपल्या कल्पना वास्तवतेला (reality ला) धरून असल्या पाहिजेत, हेही तेवढेच खरे. उदाहरणार्थ- मला पंख असते तर... मी चंद्रावर, सूर्यावर फिरून आलो असतो- असे लिहिणे योग्य होणार नाही.


असो,

नेहमी आम्ही तुम्हाला निबंध लिहायला सांगतो. यावेळी मीच एक कल्पनाप्रधान निबंध लिहून काढलाय. तो म्हणजे " मला कोरोनाचा संसर्ग झाला तर? हा कल्पनात्मक तर आहेच, पण वास्तवतेला आणि सध्याच्या परिस्थितीलाही धरून आहे.

मला कोरोनाचा संसर्ग झाला तर...
====================
.
आज संपूर्ण जगभर कोरोनाने थैमान मांडले आहे. महाशक्ती म्हणून मिरवणाऱ्या देशांनीही कोरोनापुढे गुडघे टेकले आहेत. दररोज हजारो लोक कोरोंनामुळे बळी जात आहेत. अशा परिस्थितीत कोणालाही, केव्हाही व कोठेही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो- ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी " मला कोरोनाचा संसर्ग झाला तर...?" असा विचार भल्याभल्यांच्या मनात डोकावून जातो आणि त्यांच्या काळजात चर्र होऊन जाते. कोरोनाच्या भीतीमुळे लोकांनी आत्महत्या केल्याच्या बातम्याही येऊन गेल्या. खरेतर भीतीमुळे आपण एखाद्या गोष्टीपासून सावध राहतो. परंतु आपली नेहमीची कामेही करता येणार नाही इतकी तीव्र भीती उपयोगाची नाही. अशा परिस्थितीत मीसुद्धा विचार करू लागलो की, " मला कोरोनाचा संसर्ग झाला तर...?"
.
तसे झालेच तर ती निश्चितच गांभीर्याने विचार करण्याची व कृती करण्याची वेळ असेल. मला तर कोरोंनाची लक्षणे दिसायला लागली तर माझ्या ओळखीच्या "ले-पर्सन्स" सोबत फुटकळ चर्चा करत बसणार नाही. कोरोनाची लक्षणे नसतानाही इतरांशी भेटणे मी जवळजवळ पूर्णपणेच टाळले. त्यामुळे लक्षणे जाणवल्यावर लोकांना भेटून रोगाचा प्रसार करत बसणार नाही. देवाची, बुवा बाबांची पूजा-प्रार्थना, नवस-सायास, होम हवन, मंत्रतंत्र असल्या निरर्थक गोष्टी करण्यात वेळ, बुद्धी व पैसा वाया घालवणार नाही. मी लगेच योग्य त्या दवाखान्यात, योग्य त्या डॉक्टरकडे जाईन. सहसा सरकारी दवाखान्यातच जाईन. डॉक्टर सांगतील त्याप्रमाणे औषधे घेईन, क्वारंटईन होईन किंवा दवाखान्यात भरती होईन. दवाखाना म्हणजे आपलं घर नाही हे लक्षात ठेवून दोन वेळचं खायला मिळालं आणि औषधोपचार मिळाला की खूप झालं असं समजेन. डॉक्टर स्वॅब टेस्टिंग वगैरे जे काही करतील त्याचा निकाल येण्याची वाट पाहीन.
.
25 संशयितांच्या कोरोना टेस्ट केलेल्यांपैकी एका व्यक्तीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट येतो, असे कुठेतरी वाचल्याचे आठवते. ते बरोबर असेल, तर माझा नंबर 24 निगेटिव व्यक्तीमध्ये येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे निकाल येईपर्यंत मी शांत राहीन. आजपर्यंत भारतात 80 हजार रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत अशी बातमी आहे. माझे गणित बरोबर असेल तर हे प्रमाण 16250 लोकांमागे एक असे येते. माझी शक्यता 16 हजार निगेटिव लोकांमध्ये असण्याची शक्यता जास्त असेल. एका माणसाच्या शक्यतेचा भितीदायक विचार मी करणार नाही.
.
तरीही समजा चुकून माझा निकाल पॉझिटिव आलाच तर, स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्तीवर विश्वास ठेवीन. पॉझिटिव्ह लोकांपैकी सुमारे 70 टक्के लोक स्वतःच्या रोगप्रतिकारक क्षमतेमुळे सहजच बरे होतात, असेही वाचण्यात आले. तसे असेल तर माझा नंबर या 70 टक्क्यात नक्कीच असेल. कारण रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी कार्बोदके, मेद, प्रथिने, जीवनसत्वे व लोह, जस्त यासारखी खनिजे पुरेशी मिळतील असा आहार घेण्याचा प्रयत्न करत असतो. प्रथिने म्हणजे विविध प्रकारचे अमायनो ऍसिडस मिळावेत यासाठी डाळी, कोंब आलेली कडधान्ये व विविध प्रकारचा मांसाहार यांचा आहारात नियमित उपयोग करत असतो. व्यायाम व झोपही पुरेशी घेतो. नशा करत नाही. त्यामुळे माझी रोगप्रतिकारक क्षमता निश्चितच जास्त आहे, असा माझा अनुभव आहे. त्यावर मी विश्वास ठेवीन.
.
हायड्रोक्सी क्लोरोक्वीन, रेम्डेसीवीर, डेक्सामेथासोन, अझीथ्रोमायसिन, लेंझील्युमॅब, लोपींनावीर इत्यादी औषधे कोरोंनावर वापरण्यात येतात, हे मला बातम्यांतून समजले आहे. पण मी स्वत:हून ती घेणार नाही. कारण त्यांचे जिवावर बेतणारे काही अत्यंत घातक साईड इफेक्ट्ससुद्धा मला माहीत आहेत. होमियोपॅथीची अर्सेनिक अल्बम किंवा मुळ्या-पाने यांचे काढे अशी जाहिरात करण्यात येणारी पण वैद्यकशास्त्राने सिद्ध न झालेली औषधे घेत बसून स्वत:चे आयुष्य धोक्यात टाकणार नाही. मी औषधे डॉक्‍टरांच्या सांगण्याप्रमाणेच व नियमितपणे घेईन. त्यांचा नक्कीच योग्य परिणाम होऊन मी लवकरच बरा होईल. कारण मला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार इत्यादी कोणतेही आजार नाही. हे आजार असलेल्यांची जास्त काळजी घ्यावी लागते, तरी तेही बरे होतात, असे म्हणतात.
.
वृत्तपत्रातील बातम्या नुसार आतापर्यंत सुमारे 2600 लोकांचा भारतात कोरोनाने बळी गेलाय. हे प्रमाण अत्यंत क्षुल्लक असे आहे. म्हणजेच सव्वापाच लाख लोकांमागे एक असे आहे. नेहमी बहुसंख्य प्रमाणाचा आधार घ्यायचा असतो. त्यानुसार ठणठणीत बरे राहणार्‍या पाच लाख लोकांमध्ये माझा नंबर असण्याचीच शक्यता आहे. क्षुल्लक शक्यता असलेल्या गोष्टी बऱ्याचदा घडतच नाही. म्हणून मी उगीचच त्याची काळजी करत बसणार नाही. त्यापेक्षा रस्त्यावरील अपघातात व इतर रोगांमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या बरीच जास्त आहे. वरील आकडेवारी बरोबर असेलच असे नाही, पण वास्तवतेचे निश्चित आशादायक चित्र नजरेसमोर ठेवणारी आहे. त्यामुळे उगीच अनाठायी काळजी करत बसणार नाही.
.
म्हणजेच काळजी करण्यात व पॅन्ट ओली होईल एवढे घाबरून जाण्यात काहीच अर्थ नाही. याचा अर्थ बेफिकीरपणे, बेफामपणे कसेही वागावे, असा होत नाही. कोरोनाव्हायरस हा अत्यंत संसर्गजन्य आहे, त्यावर अद्याप निश्चित असा कोणताही उपचार नाही, या विषाणूचा वाहक स्वतः माणूसच आहे, माणसाच्या शरीराबाहेर जिवंत राहण्याची व स्वतःमध्ये बदल करण्याची त्याची क्षमता मोठमोठ्या शास्त्रज्ञांनाही अचंबित करणारी आहे… याचे सदैव भान ठेवून स्वतःची व दुसऱ्यांची काळजी घेत राहीन. कोरोनावर विजय मिळवण्यासाठी सरकार, शास्त्रज्ञ, आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी इत्यादी लोक त्यांच्या परीने प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना शक्य तिथे सहकार्य करील, तेही शक्य न झाल्यास निदान त्यांना अडथळे निर्माण होतील अशाप्रकारे वागणार नाही. माझा विज्ञानावर,शास्त्रज्ञांवर विश्वास आहे. ते लवकरात लवकर या रोगावरही उपचार शोधून काढतील हा विश्वास ठेवून उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझी नेहमीची कामे शक्य तितक्या चांगल्या प्रकारे करीत राहीन.

- धनंजय आदित्य.

पाठवाचन | फूटप्रिंट्स | इयत्ता १० वी