Photo Credit - https://helian.net/ |
डायना त्याला असे प्रश्न विचारायची. लुईसनं खूप विचार केला. मग त्याला एक कल्पना सुचली- आपल्याकडची पुस्तकं डोंगरापलीकडच्या लोकांना वाचायला द्यायची. त्यांच्याजवळ ही पुस्तकं नसतील. त्यानं लगेच निर्णय घेतला आणि मनाशी पक्कं केलं- ‘एका गाढवावर मी ही पुस्तकं लादेन आणि दुसऱ्यावर मी स्वत: स्वार होईन.’
मग लुईसनं दोन धडधाकट गाढवं विकत घेतली. एका गाढवाचं नाव ठेवलं- अल्फा आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं- बीटा.
गाढवांच्या पाठीवर पुस्तकं ठेवण्यासाठी त्यानं मजबूत थैल्या बनवल्या आणि त्याच्यावर एक पाटी टांगली- ‘गाढवांवरचं ग्रंथालय.’ गाढवाच्या पाठीवर पुस्तकं लादायला डायनानं लुईसला मदत केली आणि मग प्रत्येक आठवडय़ाला लुईस, अल्फा आणि बीटा दूरदूरच्या डोंगरात आणि आडबाजूच्या खेडय़ापाडय़ांत फिरू लागले.
सूर्य आग ओकू लागला तेव्हा लुईसनं आणि दोन्ही गाढवांनी स्वच्छ पाण्याच्या ओढय़ाजवळ थोडी विश्रांती घेतली. ते ओढय़ातलं थंड पाणी प्यायलं. पाणी पिऊन तृप्त झाल्यावर मात्र बीटानं तिथेच ठिय्या मांडला. तो काही केल्या पाय उचलेना. लुईसनं त्याची वेसण जोर लावून ओढली, पण बीटा जागचा हलला नाही. मग तो बीटाला म्हणाला, ‘अरे, चल रे लवकर लवकर. मुलं आपली वाट बघत असतील.’
बीटाला जणू काही लुईसचं बोलणं कळलं. त्यानं दोन उडय़ांमध्येच ओढा ओलांडला. डोंगर चढणीचा रस्ता अगदी सुनासुना होता. फक्त पक्ष्यांचा आवाजच काय तो ऐकू येत होता. आजूबाजूला झाडांची दाटी- त्यामुळं ठिकठिकाणी काळोख दाटला होता. एकदम झाडांमधून उडी मारून एक चोर लुईसपुढे उभा राहिला. त्याच्या हातात पिस्तूल होतं.
‘मला तुझ्याजवळचा पैसाअडका दे,’ चोर पिस्तूल उगारून ओरडला.
‘कृपया आम्हाला जाऊ दे. मुलं आमची वाट बघत असतील,’ लुईसनं त्याला विनंती केली.
थैलीतील पुस्तकं पाहून चोराला खूप राग आला. त्यानं एक पुस्तक आपल्याकडं ठेवून घेतलं आणि लुईसला धमकावलं. ‘लक्षात ठेव, पुढच्या वेळी मला चांदी हवी.’
मग गाढवांच्या पाठीवरचं ग्रंथालय पुढे चालू लागलं. त्यांनी जंगल ओलांडलं, डोंगर ओलांडला आणि शेवटी लुईसला छोटीछोटी घरं दिसू लागली. इल- टॉरमेन्टोमधली मुलं लुईसला भेटण्यासाठी धावतपळत उडय़ा मारत त्याच्याजवळ आली. पुस्तकं निवडण्याआधी लुईस मुलांना म्हणाला, ‘आज मी तुमच्यासाठी एक भेट आणली आहे.’ पुस्तकांच्या गठ्ठय़ामागून लुईसनं मुखवटय़ांचं बंडल काढलं.
‘हे निरनिराळ्या प्राण्यांचे मुखवटे आहेत. आधी तुम्ही हे मुखवटे घाला. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो,’ तो म्हणाला.
त्यानं मुलांना एक सुंदर गोष्ट सांगितली. भान विसरून मुलं गोष्ट ऐकत राहिली. मुलांनी जंगली प्राण्यांचे चेहरे लावलेले होते आणि मुलं जंगली प्राण्याची गोष्ट ऐकत होते. गोष्ट संपल्यावर सगळ्या मुलांनी आपापल्या आवडीचं एकेक पुस्तक निवडलं आणि लुईसचा निरोप घेतला. मुलांनी पुस्तकं छातीशी कवटाळली आणि ते आपापल्या घराकडे निघाले. डोंगर, ओढे ओलांडून, जंगल पार करून लुईस, अल्फा आणि बीटा घरी परतले. घरी पोहचल्यावर लुईसनं आपल्या गाढवांना चारा टाकला.
डायनानं आपल्या नवऱ्याला जेवायला वाढलं. रात्री लवकर झोपण्याऐवजी लुईसनं एक पुस्तक काढलं आणि रात्री उशिरापर्यंत तो पुस्तक वाचत राहिला. दूरच्या पहाडावरसुद्धा रात्री उशिरापर्यंत दिवे आणि कंदील टिमटिमत असल्याचे त्याने पाहिले. दूरच्या गावातील मुलंही गाढवाच्या ग्रंथालयातून आणलेली पुस्तकं वाचत होती.
(कोलंबियातील सत्यकथा)
जेनिट विंटर
अनुवाद -पृथ्वीराज तौर,
(ही एक सत्यकथा आहे. ही कथा लुईस सोरईयाना यांची आहे. ते कोलंबियातील ला-ग्लोरिया नावाच्या एका छोटय़ा शहरात राहतात. काही काळ त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं. पुस्तकांची परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता त्यांना त्यावेळी लक्षात आली. त्यानंतर त्यांनी आडबाजूच्या खेडय़ापाडय़ात पुस्तकं पोहचवली. १९९० च्या दशकात लुईस सोरईयाना यांनी अवघ्या ७० पुस्तकांवर आपलं ‘गाढवांवरचं ग्रंथालय’ सुरू केलं. आज या ग्रंथालयात पाच हजारांपेक्षा जास्त पुस्तके आहेत. या वाचनालयाचे ३०० पेक्षा अधिक सदस्य आहेत. लोक प्रत्येक शनिवारी आणि रविवारी त्यांची आतुरतेनं वाट बघतात. जून २०१२ मध्ये एका अपघातात त्यांच्या पायाला मोठी इजा झाली, पण जानेवारी २०१३ पासून त्यांनी पुन्हा ग्रंथालयाचे काम पूर्ववत सुरू केले. या जगातील एक छोटा कोपरा लुईस यांनी आपल्या कर्तृत्वाने समृद्ध केला.)
Earlier Published on - https://www.loksatta.com/balmaifalya-news/library-on-the-donkeys-868805/ अनुवादक डॉ. पृथ्वीराज तौर हे नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात मराठीचे प्राध्यापक आहेत. ही कथा आपणास ‘देशोदेशीच्या कथा' या कथासंग्रहात वाचता येईल. कथासंग्रह एकूण पृष्ठे- ७२, प्रकाशक- मासिक ऋग्वेद चिल्ड्रन रिलीफ फंड आजरा, कोल्हापूर. पुस्तकासाठी संपर्क -पूजा संदीप ८६००११३५३६ किंवा सुभाष विभूते ७०५७९२८०९२